भारताच्या सागरी सीमा भक्कम करणारी आयएनएस विक्रांत

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांनी मजबूत अशा आरमाराची उभारणी केली. आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांग. ज्याच्याजवळ आरमार, त्याचा समुद्र, हे तत्त्व महाराजांचे होते. हेच तत्व आत्मनिर्भर भारताने अवलंबलं आहे. भारताचं लष्कर, हवाई दल आणि नौदल आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले आहे. त्यातही भर दिला जातोय तो स्वदेशी बनावटीवर. नौदलाच्या ताफ्यात एक विमानवाहू युद्धनौका यावर्षी दाखल होत आहे. ती आहे पहिली स्वदेशी बनावटीची. आयएसी 1 म्हणजेच आयएनएस विक्रांत 2.

विमानवाहू नौका म्हणजे एकप्रकारचा तरंगणारा हवाई तळ असतो. ज्यावर कमीत कमी 12 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर असतात. जमिनीवरून शत्रूला प्रत्युत्तर देण्याऐवजी समुद्रमार्गे त्याच्या आणखी जवळ जाऊन याद्वारे हल्ला करता येतो. या नौकेची खासियत अशी की, ती आकाराने अवाढव्य असते आणि तिच्या आसपास 10 ते 15 अन्य युद्धनौका असतात.

वस्तुत:, नौदलाच्या आधुनिकतेचा विचार करता 1910मध्ये सी-प्लेन्स, अर्थात मोठ्या बलूनमध्ये बसून लोक पुढे जात असत. त्याच्याआधीही 1850च्या सुमारास असा प्रयोग करण्यात आला होता. प्रत्यक्षात या विमानवाहू नौकेचे महत्त्व अधोरेखित झाले ते दुसऱ्या महायुद्धात. जपानकडे सर्वात मजबूत आरमार होतं. अमेरिकेच्या पर्लहार्बरवर जेव्हा जपानने हल्ला केला, त्यावेळी तब्बल सहा विमानवाहू नौका त्यात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा या नौका किती परिणामकारक असतात, हे सर्वांच्या लक्षात आले. त्यावेळी इंग्लंडकडेही सात विमानवाहू युद्धनौका होत्या. पण आजच्या घडीला अमेरिकेकडे अशा प्रकारच्या सर्वाधिक नौका आहेत.

स्वातंत्र्यानंतर भारताने ब्रिटनकडील एचएमएस हर्क्युलस ही विमानवाहू नौका खरेदी केली. तिचेच पुढे आयएनएस विक्रांत असे नामकरण झाले. पाकिस्तानविरुद्धच्या 1971च्या युद्धात या नौकेची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली. चितगाँग बंदर पूर्णपणे ब्लॉक केले. बंगालच्या उपसागरात सी ब्लॉकेड केले. अशा नौकांचे आयुष्य साधारणपणे 30 वर्षांचे असते. त्यामुळे 1987ला ही नौका भारतीय नौदलाच्या सेवतून निवृत्त करण्यात आली. याच काळात भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक विमानवाहू युद्धनौका दाखल झाली, आयएनएस विराट. 1987मध्ये ब्रिटनकडून ही नौका आपण विकत घेतली. तेव्हा तिचे नाव एचएमएस हर्मिस होते. पुढे त्याचेच नामकरण आयएनएस विराट असे करण्यात आले. तीही 2013ला सेवानिवृत्त झाली. 2013च्याच आसपास रशियाकडून आपण एक विमानवाहू युद्धनौका खरेदी केली. त्याचे नाव अॅडमिरल गोश्कॉव्ह होते. त्याचे आताचे नाव आयएनएस विक्रमादित्य आहे. हीच एकमेव विमानवाहू नौका सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात आहे.

आयएसी1 ही विमानवाहू नौका भारतीय नौदलाच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. आपल्या पहिल्या नौकेच्या स्मरणार्थ या नव्या नौकेचे नाव आयएनएस विक्रांत ठेवण्यात येणार आहे. मिग-29, तेजस यासारखी नौदलाची विमाने, एएलएच ध्रुव, कामोव यासारखी हेलिकॉप्टर त्यावर तैनात असू शकतात. 1960ला अस्तित्वात आलेल्या डिरेक्टर ऑफ नेव्हल डिझाइनने या नौकेचे डिझाइन तयार केले आहे. हा नौदलाचाच एक भाग आहे. या नौकेवरून विमाने कशी उड्डाण घेणार आणि कशी उतरणार याचा बारकाईने विचार करून तशी रचना केली आहे. उड्डाणासाठी एक उंचवटा तयार केला असून, ही विमाने जेव्हा उतरतील तेव्हा तीन मजबूत वायर बाहेर येऊन विमानाच्या मागे असलेल्या हूकला पकडून ठेवतील. त्यादृष्टीने आयएसी हे पूर्णपणे सक्षम आहे, त्यावरचा स्टाफही कुशल आहेत.

ही नौका स्वदेशी बनावटीची आहे. स्वत:च्या विमानवाहू नौकेचे डिझाइन तयार करून बांधणी करणारा भारत हा जगातील सहावा-सातवा देश आहे. कोचिन शिपयार्डमध्ये याची बांधणी झाली. त्यात सहभागी असलेल्या कंपन्या या सर्व भारतीयच आहेत. यात जवळपास 76 टक्के सुटे भाग स्वदेशी आहेत. अशा नौकांसाठी विशेष स्टीलची गरज असते, पण ते बाहेरून न मागवता स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियानेच तयार केले आहे. यासाठी तब्बल 21 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. एवढ्या स्टीलमध्ये तीन आयफेल टॉवर उभे राहू शकतात.18 मजली या जहाजात 1500 मीटरच्या केबलचा वापर करण्यात आला आहे. त्यातील इंजिन किर्लोस्कर कंपनीचे आहे. तिथे 24 मे. वॅ.ची वीजनिर्मिती होईल. त्यावर जवळपास 1500 क्रू मेंबर असतील. अशा या महाकाय नौकेमुळे भारताची सागरी सीमा नक्कीच भक्कम होईल.

नितीन अ. गोखले
मुख्य संपादक, भारतशक्ती मराठी