जागतिक शांततेसाठी…

देशासह जगभरात शांतता नांदावी, अशी भारताची कायमच भूमिका राहिली आहे. यासाठीच संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) शांतता मोहिमेअंतर्गत विविध देशांमध्ये शांतता राखण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी, 1950पासून भारतीय लष्कर योगदान देत आहे. अशा 71पैकी 51 शांतता मोहिमेत भारतीय सैनिकांचा सहभाग राहिला आहे. 1950पासून आतापर्यंत (2022) दोन लाख 58 हजारांहून अधिक सैनिक यूएनच्या शांतता मोहिमेत सहभागी झाले. आजपर्यंत 159 भारतीय सैनिकांनी बलिदान दिले आहे. आपल्या 20 ते 25 अधिकाऱ्यांनी नेतृत्व केले आहे किंवा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आठ मोहिमांमध्ये 5,404 भारतीय शांती सैनिक तैनात आहेत. आता सुदान आणि दक्षिण सुदानदरम्यान तेलाचे केंद्र असलेल्या अबिया येथे शांतता मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात भारताची एक बटालियन सहभागी आहे.

अशा शांतता मोहिमेत सहभागी होण्याची भारताची गौरवशाली परंपरा आहे. 1950च्या युद्धात पॅराफिल्ड अम्ब्युलन्स कार्यरत होती, त्यात भारतीय डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1953च्या कोरियातील शांतता मोहिमेत जनरल के. एस. थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी सहभाग घेतला होता. भारतीय सैन्याचा हा पहिला सहभाग आहे.

दिवंगत सीडीएस बिपीन रावत हे 2008मध्ये काँगोमध्ये शांतता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा ते ब्रिगेडियर होते. संयुक्त राष्ट्रात त्यांची ओळख ब्रिगेडियर जनरल अशी होती. त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाचे ऑपरेशन केले होते. तेव्हा त्यांची लीडरशिप सर्वांच्या नजरेत आली. तिथेच त्यांना प्रसिद्धी मिळाली. या अशा मिशनमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध देशांच्या सैनिकांचे नेतृत्त्व करावे लागते. त्यांना प्रोत्साहन देऊन समन्वय साधत मोहीम तडीस न्यावी लागते. हे कठीणच काम असते. तसे पाहिले तर, सैनिकांची सर्वच कामे कठीणच असतात. पण रावत यांनी ही जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडली होती. भारताचे लेफ्टनट जनरल शैलेश तिनईकर हे सध्या सुदानच्याच एका मोहिमेचे प्रमुख आहेत.

आता उत्तर पूर्व आफ्रिकेतील सुदानमध्ये शांतता मोहीम राबविण्यात येत आहे. या भागात चीन आर्थिक ताकदीच्या जोरावर आपला प्रभाव वाढवत आहे. पण भारताचे आफ्रिकेशी पूर्वापार ऋणानुबंध आहेत. आपल्याकडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सैनिकांना प्रारंभिक प्रशिक्षण दिले जाते. तिथे एक प्रमुख प्रशासकीय इमारत आहे, तिला ‘सुदान ब्लॉक’ म्हटले जाते. जेव्हा एनडीएची सुरुवात झाली होती, तेव्हा सुदानच्या तत्कालीन नेत्यांनी त्याला फार मोठी देणगी दिली होती. त्यामुळेच त्या इमारतील ते नाव देण्यात आले. घाना देशातील गुप्तचर यंत्रणेची उभारणी आणि संबंधितांना प्रशिक्षण भारतीय रॉचे तत्कालीन प्रमुख आर. एन. काव आणि शंकरन नायर या दोघांनी दिले आहे. त्यामुळे भारताचे आफ्रिकेशी राजनैतिक तसेच सांस्कृतिक संबंध खूप चांगले आहेत. त्यामुळे भारतीय सैनिकांचे आफ्रिकेत कायमच स्वागत केले जाते.

 

सेंटर फॉर यूएन पीस-कीपिंग
दिल्लीत सेंटर फॉर पीस-कीपिंग स्थापन करण्यात आले आहे. तिथे आतापर्यंत आपले जवळपास साडेआठ हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षित झाले आहेत. एवढेच नव्हे तर, 1600हून अधिक विदेशी अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

इंडो-चायनाची गल्लत
जेव्हा भारत आणि चीनमधील वादाची, ताणावाची चर्चा होते, तेव्हा बहुतांश लोक त्याचा उल्लेख इंडो-चायना असा करतात. ते अनुचित आहे. त्याला सायनो-इंडिया किंवा इंडिया-चायना म्हटले पाहिजे. कारण इंडो-चायना हा वेगळा भाग होता. कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कोरिया या क्षेत्राला पूर्वी इंडो-चायना म्हटले जात होते. आता आसियान किंवा आग्नेय आशिया देश म्हटले जाते. 1953च्या यूएन शांती मोहीम या क्षेत्रात राबविली गेली होती.

 

– नितीन अ. गोखले
(शब्दांकन – मनोज जोशी)