‘एलओसी’ आणि ‘एलएसी’तील सीमारेषा

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान सीमेवर अतिरेक्यांशी वरचेवर धुमश्चक्री होत आहे. शिवाय, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेच जाते. या सर्व घटनांमध्ये सातत्याने एक उल्लेख येतो, एलओसी – लाइन ऑफ कंट्रोल – अर्थात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. पण 2020च्या मे-जूनच्या दरम्यान लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैनिकांना आपले भारतीय सैनिक भिडले. त्यावेळी आणखी एक शब्द समोर आला. एलएसी – लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात, वास्तविक नियंत्रण रेषा. अनेकदा या दोन्ही, म्हणजे एलओसी आणि एलएसीबद्दल गल्लत होताना दिसते. काय आहे, एलओसी आणि एलएसी?
एलओसी ही 3323 किलोमीटर लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेचा एक भाग आहे. जम्मूच्या चिनाब नदीच्या दक्षिणेकडील मुनव्वर येथून सुरू होणारी उजवीकडे सियाचेन ग्लेशियरच्या बेसपर्यंतची (एनजे 9842) 740 किमीची सीमारेषा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आहे. उर्वरित 2474 किमीच्या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हटले जाते. ही रेषा व्यवस्थित आखलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पराने स्वीकारलेली ही सीमा कोणीही पार करू शकत नाही. 740 किमीपैकी 550 किमीच्या सीमेवर भारताच्या बाजूला कुंपण घालण्यात आले आहे. हे काम 2003पासून सुरू आहे. एलओसी ओलांडून भारतात येणे हे युद्धसदृश मानले जाते. त्यामुळे ही सीमा ओलांडणाऱ्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार भारतीय लष्कर, सीमासुरक्षा दल किंवा अन्य सुरक्षा दलांना आहे.
एलएसी ही भारत आणि चीन दरम्यानची सीमारेषा आहे. हिमालयानजीक ही सीमा आहे. अरुणाचलजवळ भारत, म्यानमार आणि चीन या तीन देशांच्या संयुक्त सीमेकडून ही एसएसी सुरू होते. भारत, चीन, अफगाणिस्तान या तीन देशांच्या संयुक्त सीमेपर्यंत ही एलएसी पसरली आहे. ही एलएसी 3488 किमी लांब आहे. एलओसी आणि एलएसी या दोहोंमध्ये मूऴ फरक हा आहे की, एलएससी आखलेली आहे, तर एलएसी पूर्णपणे संकल्पित आहे. ही नकाशात तसेच जमिनीवर आखलेली नाही. विशेष म्हणजे, एलएसी नक्की कोठे आहे, याबाबत भारत आणि चीनची स्वतंत्र मते आहेत. भारत आणि चीनमधील तणावाचे हे एक कारण आहे.
भारतीय जवान तिथपर्यंत गस्त घालतात की, ते जिथपर्यंत भारतीय हद्द समजतात. तर ही आपली एलएसी आहे, असे गृहित धरून चिनी सैनिक तिथपर्यंत गस्त घालतात अशा रीतीने भारत आणि चिनी सैनिक अनेकदा आमनेसामने येतात. असे अनेकदा घडते. पण ते बॅनर ड्रीलचे पालन करतात. ते एकमेकांना बॅनर दाखवतात. भारतीय जवान चिनी सैनिकांना सांगतात की, तुम्ही भारताच्या भूमीवर आहात. तर, चिनी सैनिक सांगतात की, तुम्ही चीनच्या भूभागात आहात. ते एकमेकांकडून बघून हसतात आणि आपल्याकडील बिस्कीट-चॉकलेटचे कागद, सिगारेटची पाकिटे अशा काही गोष्टी तिथे टाकून देतात आणि माघारी फिरतात. असे जवळपास गेली चाळीस वर्षे सुरू आहे.
1980च्या सुरुवातीपासून भारत आणि चीनच्या दरम्यान सीमारेषेवरून बोलणी सुरू आहेत. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात अनेक करार झाले. 1993, 1996, 2002, 2005 आणि अलीकडे 2013 साली करार झाला. हे सर्व करार दोन्ही देशांच्या सैनिकांसाठी एकप्रकारची मार्गदर्शक तत्त्वे होती.
उभय देशांमध्ये झालेल्या करारांचे मुद्दे काय आहेत?
एलएसीवर बंदुकांचा वापर करण्यास मनाई आहे. सैनिक आपल्या जवळ बंदूक बाळगू शकतात. पण त्या खांद्यावरच असल्या पाहिजेत आणि त्या बंदुकीच्या नळ्या जमिनीच्या दिशेने असल्या पाहिजेत. म्हणजेच, उभयतांपैकी कोणाकडूनही आक्रमण होणार नाही, याचे ते निदर्शक आहे. त्याचे काटेकोरपणे पालन होत आले आहे.
45 वर्षे शांतता
गलवान खोऱ्यात 15 जून 2020मध्ये झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले तर, 30-35 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. 1975मध्ये एलएसीवर मृत्यू नोंदवला गेला होता. त्यानंतर जवळपास 45 वर्षांनंतर इतके मृत्यू झाले.
– नितीन अ. गोखले
(अनुवाद – मनोज जोशी)