बांगलादेशच्या निर्मितीचे हे 50वे वर्ष आहे. भारताने लष्करी हस्तक्षेप केल्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यावेळी पाकिस्तानबरोबर झालेल्या 1971च्या युद्धात फिल्ड मार्शल सॅम माणिकशा यांची भूमिका फार महत्त्वाची होती.
अमृतसर येथे 3 एप्रिल 1914 रोजी सॅम माणेकशा यांचा जन्म झाला. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. या स्वभावामुळे अशांचे करियर अनेकदा धोक्यात येते. पण माणेकशा यांची कार्यकुशलता वाखाणण्याजोगी होती. त्यांच्यात चांगले नेतृत्व गुण होते. 1969मध्ये माणिकशा सेनाप्रमुख बनले. त्याआधी तीन वर्षं कलकत्त्यात ईस्टर्न आर्मी कमांडर होते. त्यामुळे त्यांना पूर्व पाकिस्तानात नेमकी काय परिस्थिती आहे, याची कल्पना होती. त्याच दरम्यान त्यांनी मिझो बंडखोरी नियंत्रणात आणली होती.
पूर्व पाकिस्तानात (आता बांगलादेश) मार्च 1971मध्ये नरसंहार सुरू झाला, पाकिस्तानी लष्कराने हा नरसंहार करतानाच महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासित दाखल होऊ लागले. पूर्व पाकिस्तानातील 70-75 लाख हिंदू आणि मुसलमान नागरिकांनी देशातील पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, आसाम अशा विविध राज्यांमध्ये आश्रय घेतला. भारतावर येणार हा ताण तसेच पूर्व पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला नरसंहार आणि स्त्रियांवरील अत्याचार पाहता भारताला लष्करी कारवाई करावी लागली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे सल्लागार पी. एन. हकसर, डी. पी. धर तसेच भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची होती. रॉची स्थापना या कारवाईच्या तीन वर्षआधीच झाली होती आणि त्याचे प्रमुख आर. एन. काव होते.
ही कारवाई करण्याचा निर्णय एका रात्रीत घेण्यात आला नाही. पूर्व पाकिस्तानातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्या स्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घेतले गेले. शेवटी लष्करी कारवाई करण्याचे निश्चित झाले आणि आपल्या तिन्ही दलांनी एकत्रितपणे शेवटचा घाव घातला. 3 ते 16 डिसेंबर या कालावधीत पाकिस्तानसमवेत युद्ध झाले.
तत्पूर्वी, एप्रिल 1971मध्ये बोलावलेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये फिल्ड मार्शल माणेकशा यांना पाचारण करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्याकडे उपलब्ध पर्यायांबाबतची माहिती घेतली होती. लष्करी कारवाई करता येईल का, असे त्यांनी विचारले असता माणेकशा यांनी घाई न करण्याचा सल्ला दिला. पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती युद्धासाठी आता तरी अनुकूल नाही, तेव्हा आपल्याला सबुरीने घ्यायला लागेल, असे ते म्हणाले होते.
आता जर युद्ध पुकारले आणि आम्हाला पूर्व पाकिस्तानात जावे लागले तर समस्या उद्भवू शकते. मान्सून तोंडावर होता आणि तो दाखल झाल्यानंतर पूर्व भागात नद्या दुथडी भरून वाहू लागतात. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी पूल, रस्ते बंद होतील आणि आपले सैन्य तिथे अडकून पडेल, असे सांगत त्यांनी संयमाने घेण्याचा सल्ला दिला. याशिवाय, निधी न मिळाल्याने रणगाडे व इतर शस्त्रास्त्रे अद्याप पूर्णत: सैन्याला उपलब्ध झालेले नाहीत, असे त्यांनी निर्भिडपणे सांगितले. त्यानंतर कॅबिनेटने सांगितले की, ‘ठीक आहे. तुम्ही तयारी करा. आपण पाहूया की, काय परिस्थिती निर्माण होते ते.’ तेव्हापासूनच नियोजनाला सुरुवात झाली आणि मात्र प्रत्यक्षात युद्ध झाले ते डिसेंबरमध्ये.
या युद्धात जेव्हा भारताने पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांना शरणागती पत्करायला लावली, तेव्हा ते स्वत: तिथे गेले नाहीत. त्यांनी आपले ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनन्ट जनरल जगजीत सिंग अरोरा यांना पाठविले. बांगलादेशच्या निर्मितीनंतर दोन-तीन महिन्यांनंतर तिथे ते गेले होते.
या 93 हजार युद्धकैद्यांना वेगवेगळ्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. एकदा त्यांनी एका कॅम्पला भेट दिली तेव्हा, एक पाकिस्तानी कैदी त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आम्ही सुद्धा बहादूर आहोत. लढायचे कसे ते आम्हालाही माहीत आहे. पण आमच्याकडे तुमच्यासारखे अधिकारी असते, तर आम्ही जिंकलो असतो.’ माणेकशा यांच्या नेतृत्व गुणाला मिळालेली ही दाद होती.
चौकशी समितीच्या फेऱ्यात
1961मध्ये ते मेजर जनरल होते. उटीजवळील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे कमांडंट होते. एकदा ते विमानातून जात असताना सोबत एक विदेशी राजनैतिक अधिकारी होता. बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने संरक्षणमंत्री आणि त्यांच्या धोरणांसंदर्भात माणेकशा यांचे मत विचारले. नंतर त्या अधिकाऱ्याने तसा अहवाल आपल्या दूतावासाला दिला. त्याची कुणकुण तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना लागली. मेजर जनरल माणेकशा यांचा आपल्या जीभेवर ताबा नाही, संरक्षणमंत्री किंवा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबाबत त्यांना आदर नाही, त्यामुळे त्यांना लगाम घातला पाहिजे, या उद्देशाने मेनन यांनी चौकशीचे आदेश दिले. माणेकशा यांचे सहकारी लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्यासमवेत कॉलेजमधील इतर सहकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात आली. पण कोणीही त्यांच्याविरुद्ध जबाब दिला नाही. त्यामुळे त्या चौकशी समितीच्या हाती काहीही लागले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ते 1962च्या चीनविरुद्धच्या युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत.
त्यानंतर तेजपूर येथे त्यांना पाठविण्यात आले. चीनबरोबर पराभूत झाल्याने तेथे तैनात सैन्याचे मनोबल खचले होते. काही जण पळून आले होते. काही जणांना अटक करण्यात आली होती. अशा परिस्थितीत माणेकशा तिथे गेले आणि म्हणाले, ‘आता मी आलो आहे. यापुढे आणखी शरणागती नाही आणि माघारही नाही.’ या एकाच वाक्याने सैनिकांमध्ये उत्साह संचारला. पाकिस्तानसमवेतच्या 1965च्या युद्धाच्या आधी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सॅम माणेकशा यांना इस्टर्न आर्मी कमांडर बनविले. नंतर ते फिल्ड मार्शल बनले.
असाही एक योगायोग
ब्रिटिश सरकारने 1932मध्ये भारतीय लष्करी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंडियन मिलिटरी अकादमीच्या पहिल्या बॅचमध्ये सॅम माणेकशा होते. विशेष म्हणजे, या बॅचचे तिघेजण आपापल्या देशात लष्करप्रमुख बनले. माणेकशा भारताचे, मुसा खान हे पाकिस्तानचे, तर स्मित डन हे बर्माचे (म्यानमार) सैन्यप्रमुख बनले.
– नितीन अ. गोखले
(शब्दांकन : मनोज जोशी)
संबंधित मुलाखत पाहा
https://www.youtube.com/watch?v=6m9948nfNCo&feature=youtu.be