भारतीय सैन्याचा लाहोरला घेराव, का आणि कसा?

भारतीय लष्कराने 1971च्या युद्धात अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानचला दाती तृण धरायला लावले. पण पाकिस्तानची ही खुमखुमी 1947 साली त्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच होती. 1965मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानला भारतीय लष्कराने सहजरीत्या धोबीपछाड दिला. त्यांनी थेट लाहोरपर्यंत धडक दिली होती. पाकिस्तानच्या ते ध्यानीमनीही नव्हते.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते. त्यातच 1962मध्ये चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताला पराभव पत्कारावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय सेनेचे मनोबल खचले असेल आणि भारताचे नेतृत्व कणखर नसेल, असा आडाखा पाकिस्तानने बांधला आणि तसे डावपेच आखण्यास सुरुवात केली. भारताकडील काश्मीर खोऱ्यावर ताबा मिळविण्यासाठी ही चांगली संधी आहे, असा विचार फिल्ड मार्शल अयुब खान आणि झुल्फिकार अली भुत्तो यांनी केला होता. त्यानुसार 22 जून 1965 रोजी पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ सुरू केले. मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम सेनापतींची नावे दिलेल्या आठ टोळ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात प्रवेश करून श्रीनगरचा ताबा घ्यायचा, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी एकूण तीस हजार भाडोत्री मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी सैनिकांना गोळा करण्यात आले होते. याची बातमी लागल्यावर भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले. 12 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानची ही कारवाई कोणतेही उद्दिष्ट साध्य न करता पूर्णत: फसली होती.

त्यानंतर पाकिस्तानने जम्मूतील अखनूरनजीक छंब-जौरीया परिसरात सैनिक आणि रणगाडे आणून ठेवले होते. जम्मू आणि काश्मीरला जोडणारा अखनूरचा पूल काबीज करून अखनूर शहरावरही पाकिस्तानी सैनिक ताबा मिळवतील, अशी चिन्हे होती. या कारवाईला ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी भारताने सावध भूमिका घेतली. 1 सप्टेंबरला सुरू झालेल्या या मोहिमेत प्रारंभी छंब-जौरीया क्षेत्रातून भारतीय सैन्याच्या तुकड्यांना माघार घ्यावी लागली. 5-6 सप्टेंबरपर्यंत भारतीय लष्कराने हे आक्रमण थोपवून धरले. दरम्यान, पाकिस्तानला रोखण्याच्या संदर्भात तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, लष्करप्रमुख जनरल जे. एन. चौधरी, एअरचीफ मार्शल अर्जन सिंग यांच्यात लागोपाठ बैठका झाल्या. पाकिस्तानाला हिसका दाखविण्यासाठी पंजाब येथे नवी आघाडी उघडण्याचा निर्णय 4 सप्टेंबर रोजी एका बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याकडे जाऊन ती माहिती दिली. पंतप्रधानांनी त्या मोहिमेला लगेच परवानगी दिली.

त्यानुसार 5 सप्टेंबरच्या रात्री ऑपरेशन रिडल सुरू झाले. सतलज आणि व्यास (बियास) नदीचे पाणी घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने इछोगिल कालवा तयार केला होता. खरे तर, पाकिस्तानात रणगाडे व युद्धसामग्रीचे ट्रक घेऊन जाण्यात हा कालवा अडचणीचा ठरणार होता. तरीही भारतीय सेनेने तशी आखणी केली. भारतीय पायदळ सुरुवातीला हा कालवा ओलांडून जाणार होते. त्याप्रमाणे थ्री जाट बटालियनने तो कालवा ओलांडला आणि पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. तिथे पाकिस्तानचे जास्त सैन्य नसल्याने तेवढा विरोध झाला नाही. या बटालियनने 35 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवले तर, दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ते गतीने पुढे निघाले. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले रणगाडे, शस्त्रसाठा घेऊन येणारे मागे राहिले. ही बटालियन लाहोरजवळील बाटापूर या परिसरात जाऊन थांबली. संसदेत दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबरला आपण आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडल्याची घोषणा तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली.

पाच-सहा तास थांबल्यानंतर या बटालियनला माघारी बोलावण्यात आले. पण यामुळे पाकिस्तान हादरले होते. भारत आंतरराष्ट्रीय ओलांडून येईल, असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानने छंब-जौरीयातील सैन्य लाहोरजवळ हलविल्याने भारतीय सैनिकांनी पुन्हा आक्रमक झाले.

पंजाबच का?
भारत आणि पाकिस्तानदरम्यानची 740 किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ही वादग्रस्त सीमा जाते. त्याच्या दक्षिणेकडे जम्मूपासून गुजरातपर्यंत जी सीमारेषा आहे, ती आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून ओळखली जाते. आक्रमणाच्या हेतूने जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडली जाते, तेव्हा ती युद्धाची घोषणा मानली जाते. या पार्श्वभूमीवर भारताच्या हद्दीतील पंजाबमधून पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय लष्कर घुसणार होते, त्यामुळे ती युद्धाची घोषणा ठरली असती आणि त्याची व्याप्तीही अधिक असती. आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही दबाव आला असता. त्यातच दोन्ही देशांची आर्थिक स्थिती त्यावेळी चांगली नव्हती. तरीही ही जोखीम घेण्यात आली.

…म्हणून लाहोरमध्ये प्रवेश नाही
भारतीय लष्कराची तुकडी लाहोरजवळील बाटापूरला गेली. पण पुढे जाण्याचा भारताचा मनसुबा नव्हता. लाहोरवर ताबा मिळविण्याची योजनाही नव्हती. लाहोर हे एक मोठे शहर होते आणि मोठ्या शहरावर जेव्हा लष्कर कब्जा करते तेव्हा तिथे रक्तपातही तेवढाच होतो. शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता, पायदळ थेट आतमध्ये प्रवेश करत नाही. ती त्याला घेराव घालते. केवळ लाहोर धोक्यात आहे, याची जाणीव पाकिस्तानला करून देत छंब-जौरीयातील दबाव कमी करण्याचा हेतू या कारवाईमागे होते. त्यात भारतीय सैन्य यशस्वी ठरले.

रणगाड्यांचे युद्ध
पंजाबमधील खेमकरण आणि असलउत्तर येथे घनघोर युद्ध झाले. असलउत्तर येथील रणसंग्राम हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा रणगाड्यांचा संग्राम म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानने आपल्या लष्करातील सर्वांत बलिष्ठ सशस्त्र विभाग रणांगणात उतरवला होता. त्यांच्याकडे अमेरिकन बनावटीचे नवे रणगाडे होते. पॅटन हा अमेरिकी बनावटीचा रणगाडा त्या वेळी जगातील अत्याधुनिक रणगाड्यांमध्ये गणला जात असे. ते सर्व भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. हे नवे रणगाडे अत्याधुनिक होते आणि ते चालविण्याचा पाकिस्तानी सैन्याचा सराव झाला नव्हता. तर, भारताकडे दुसऱ्या महायुद्धातील जुने रणगाडे होते. ते कसे ऑपरेट करायचे, याची पूर्ण माहिती भारतीय सैनिकांना होती. त्यामुळे त्या युद्धात पाकिस्तानकडे अत्याधुनिक रणगाडे असूनही भारताची सरशी झाली.

कोण हरले, कोण जिंकले?
सन 1965च्या युद्धात कोणालाच स्पष्ट विजय मिळालेला नाही, असे म्हटले जाते. मात्र तसे नाही. पाकिस्तानने हे युद्ध सुरू केले होते. भारतीय सैन्याला आणखी एका पराभवाची धूळ चारत काश्मीर खोऱ्यावर कब्जा करण्याचा त्यांचा इरादा होता. पण आपल्या जवानांनी त्यांचा तो डाव उधळून लावतानाच पाकिस्तानचा जास्त इलाका आपल्या ताब्यात घेतला. भारताने जास्त पाकिस्तानी सैनिक यमसदनी पाठविले. मग असे असताना हे युद्ध अनिर्णायक कसे म्हणता येईल?

– नितीन अ. गोखले
(शब्दांकन : मनोज जोशी)

संबंधित मुलाखत पाहा –
https://youtu.be/lJLkEUEoNIE