प्रजासत्ताक दिनाची परेड ठरणार संस्मरणीय

26 जानेवारी 2022 रोजी म्हणजे आज देश 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनाची परेड खास असणार आहे. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’अंतर्गत साजऱ्या होणाऱ्या परेडची सुरुवात सकाळी 10.30 वाजता होईल. परेड आणि हवाई प्रदर्शनासाठी अधिक चांगली दृश्यमानता असावी यादृष्टीने, ही वेळ सकाळी 10 ऐवजी 10.30 करण्यात आली आहे.

यंदापासून प्रजासत्ताक दिनाचा महोत्सव 23 ते 30 जानेवारी असा साजरा होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला या महोत्सवाला प्रारंभ झाला असून, हुतात्मा दिनी म्हणजेच 30 जानेवारी रोजी त्याची सांगता होईल. याआधी हा महोत्सव 24 ते 29 जानेवारीदरम्यान साजरा केला जात होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील आणि देशाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना ते आदरांजली वाहतील. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर परेड पाहण्यासाठी राजपथवरील मानवंदना मंचाकडे जातील. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर 21 तोफांची जोरदार सलामी देऊन राष्ट्रगीत होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर परेडला सुरुवात होईल.

अनोखे उपक्रम
मुख्य संचलनादरम्यान अनेक उपक्रम पहिल्यांदाच आयोजित केले असून यात राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांद्वारे ‘शहीदों को शत शत नमन’ कार्यक्रमाचा आरंभ; भारतीय हवाई दलाच्या 75 विमाने/हेलिकॉप्टर्सचे भव्य हवाई प्रदर्शन; देशव्यापी वंदे भारतम नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ‘कला कुंभ’ कार्यक्रमादरम्यान दृश्यकला पद्धतीचा वापर करून स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी 75 मीटर लांबीच्या दहा लेखपटांचे प्रदर्शन आणि या सोहळ्याच्या प्रेक्षकांना चांगल्या रितीने अनुभवता यावा यासाठी 10 मोठ्या एलईडी स्क्रीन; ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 1,000 ड्रोनचा वापर यासारख्या अनोख्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

पुरस्करा विजेत्यांचा सहभाग
सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते परेडमध्ये सहभागी होतील. यात परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांचा समावेश आहे. सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव, 18 ग्रेनेडियर्स (निवृत्त) आणि सुभेदार (मानद लेफ्टनंट) संजय कुमार, 13 जेएके रायफल्स हे परमवीर चक्रविजेते आणि अशोक चक्रविजेते कर्नल डी. श्रीराम कुमार जीपवर उपसंचलन कमांडर म्हणून नेतृत्व करतील.

अशी असेल परेड
पहिली तुकडी पूर्वीच्या ग्वाल्हेर लान्सर्सच्या गणवेशातील मेजर मृत्युंजय सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील 61 घोडदळाची असेल. 61 घोडदळाच्या माऊंटेड कॉलमद्वारे भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व केले जाईल. लष्कराच्या एकूण सहा संचालन तुकड्या सहभागी होतील. यात राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू आणि काश्मीर लाइट रेजिमेंट, शीख लाइट रेजिमेंट, आर्मी ऑर्डनन्स कोअर आणि पॅराशूट रेजिमेंट यांचा समावेश आहे.

विविध टप्प्यावरील बदलाचे दर्शन
गेल्या 75 वर्षांतील भारतीय लष्कराच्या गणवेश आणि जवानांच्या शस्त्रास्त्रांच्या विकासाच्या विविध टप्प्यावरील प्रदर्शन ही संचलन तुकड्यांची संकल्पना असेल. परेड सहभागी लष्कराच्या सहा तुकड्या लष्कराचे आतापर्यंतचे गणवेश परिधान करून संचलन करतील.
नौदलाच्या तुकडीमध्ये 96 तरुण नौसैनिक आणि चार अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तुकडीच्या कमांडर म्हणून लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा नेतृत्व करतील. त्यानंतर भारतीय नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे प्रदर्शन आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत प्रमुख उपक्रमांना अधोरेखित करणारा नौदलाचा चित्ररथ सादर केला जाईल.

भारतीय हवाई दलाची तुकडी
भारतीय हवाईदलाच्या तुकडीमध्ये 96 सैनिक आणि चार अधिकारी असून या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर प्रशांत स्वामीनाथन करतील. ‘भारतीय हवाईदल, भविष्यासाठी परिवर्तन’ या शीर्षकाखाली भारतीय हवाई दलाचा चित्ररथ सादर होणार आहे.

डीआरडीओचा चित्ररथ
देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविणारे दोन चित्ररथ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) सादर करणार आहे.

इतर चित्ररथ
प्रजासत्ताक दिन परेडमधील इतर चित्ररथ हे 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. तर उर्वरित नऊ विविध मंत्रालयांचे असतील. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मेघालय, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. यात ‘महाराष्ट्राची जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या विषयावरील चित्ररथाचा समावेश आहे.
चित्रररथांच्या सादरीकरणानंतर, ‘वंदे भारतम’ या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. यानंतर बीएसएफच्या सीमा भवानी मोटरसायकल पथक आणि इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) हिमवीर यांच्याकडून दुचाकीवरील कवायती सादर केल्या जातील.

भव्य समारोप
पहिल्यांदाच भारतीय दलाची 75 विमाने/हेलिकॉप्टर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून अनेक प्रकारे हवाई प्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रगीतासह तिरंगी फुगे आकाशात सोडून समारंभाची सांगता होईल. प्रथमच भारतीय हवाई दलाने हवाई प्रदर्शनादरम्यान कॉकपिटमधून दिसणारी दृश्ये दाखवण्यासाठी दूरदर्शनशी समन्वय साधला आहे.

नितीन अ. गोखले
मुख्य संपादक, भारतशक्ती मराठी